मकर संक्रांतीच्या सुमुहूर्तावर डोंबिवली बँकेचे
युपीआय् पेमेंटसाठी डीएन्एस् पे अॅप सज्ज
डोंबिवली – कोरोनाच्या संकटकाळामुळे रोख विरहीत व्यवहारांना चालना मिळाली आहे. अनेक व्यापारी, दुकानदार, रेस्टॉरंटस्, आस्थापना इतकेच काय पण रस्त्यावरील फेरीवाल्यांनीही क्यु.आर.कोडद्वारे रक्कम स्वीकारायला सुरूवात केली आहे.
याबाबी लक्षात घेऊनच डोंबिवली नागरी सहकारी बँकेने ‘‘डीएन्एस् पे’’ अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे सर्व प्रकारची युपीआय् पेमेंटस् करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली बँकेचे ग्राहक, आपल्या अन्य बँकांमधील खात्यांचे व्यवहारही या अॅपद्वारे करू शकणार आहेत. तसेच या अॅपद्वारे क्यु.आर.कोड स्कॅन करून रक्कम अदा करणे शक्य झाले आहे.
डोंबिवली बँकेने आपल्या ग्राहकांना क्यु.आर.कोड देण्यास सुरूवात केली आहे. डोंबिवली बँकेच्या क्यु.आर.कोडद्वारे कोणत्याही पेमेंट अॅपद्वारे पैसे स्वीकारता येणार आहेत. ग्राहकांनी आपल्या खात्याचा क्यु.आर.कोड जनरेट करण्यासाठी आपल्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा तसेच ही सेवा नि:शुल्क असल्याचे बँकेने आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
प्ले स्टोअर डीएन्एस् पे हे अॅप उपलब्ध असून ग्राहकांनी ते डाऊनलोड करून घ्यावे व आपले खाते त्याच्याशी लिंक करावे असे आवाहन डोंबिवली बँकेने केले आहे. अॅप स्टोअरवर देखील लवकरच हे अॅप उपलब्ध होणार आहे.