डोंबिवली नागरी सहकारी बँक २० ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर हा कालावधी सायबर सुरक्षा जागरूकता सप्ताह म्हणून साजरा करत आहे. या दरम्यान शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी डोंबिवली नागरी सहकारी बँक आणि टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने, वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने सायबर सुरक्षा या विषयावर एक अभ्यासपूर्ण सत्र आयोजित केले होते.
कार्यक्रमाला टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. "डोंबिवली सारख्या सुशिक्षित शहरातही अनेकांची फसवणूक होतं असून जवळपास रोजच अशा नवनवीन तक्रारी येत असल्याबाबत धक्कादायक माहिती उपस्थिताना दिली. शेअर मार्केट मध्ये दुप्पट पैसे कमवून देण्यासाठी टिप्स देणारे ग्रुप्स, सोशल मीडियावर काम करून घरबसल्या हजारो रुपये कमवा, अशा अनेक जाहिरातीना बळी पडून लवकर श्रीमंत होण्याच्या नादात सुशिक्षित नागरिकही सायबर क्राईम चे शिकार होतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. अशाच प्रकारे काही वेळा खोटी माहिती देऊन लोकांना घाबरवून पैसे लाटण्याचे प्रकार होताना दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांनी कोणत्याही प्रकारे अशा गोष्टींच्या आहारी जाऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले. निसंकोचपणे पोलिसांची मदत घ्यावी"
कार्यक्रमात डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संचालक श्री योगेश वाळुंजकर यांनी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क कसे राहावे याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. योग्य पद्धतीने पासवर्ड ठेवणे, विविध वेबसाईट्स चा वापर करताना काळजी घेणे, सोशल मीडियावर अपडेट्स देताना तरतम्य बाळगणे अशा साध्या नियमांचे पालन करून बहुतांश सायबर धोके/गुन्हे रोखता येतील असे सांगितले.
सायबर गुन्हेगार विविध युक्त्या वापरून नागरिकांना प्रलोभने दाखवून किंवा भीती निर्माण करून फसवण्यात बरेचदा यशस्वी होतात
अशावेळी आपण आपले सामान्य व्यवहार ज्ञान वापरले तर हे धोके नक्की टाळू शकतात. अनेक वेळेस फसवणूक करणाऱ्या व्हिडिओ कॉल द्वारे चारित्र्य हनन करण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि ब्लॅकमेल केले जाते. हे अगदी तरुण वयातील मुला मुलींपासून ते वयोवृद्द नागरिकांमध्ये होतं आहे. अशावेळी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्या कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घेऊन पोलीसांची मदत घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आर्थिक व्यवहार करून आपली फसवणूक करून घेऊ नये. " असे आवाहन योगेश वाळुंजकर यांनी केले. तसेच अशी काही फसवणूक झाली तर ताबडतोब १९३० या नंबर वरती संपर्क केल्यास तात्काळ उपाय योजना शक्य होते असे सांगितले.
कार्यक्रमात डोंबिवलीमधील २०० हुन अधिक नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. अनेकांनी प्रश्न विचारले ज्याचे समाधान श्री योगेश वाळुंजकर यांनी केले. सायबर सुरक्षा साप्ताहानिमित्त डोंबिवली नागरी सहकारी बँकेने प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि रिल स्पर्धा आयोजित केली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन या वेळी बँकेचे सायबर सुरक्षा अधिकारी नितीन बेंडाळे यांनी केले.
सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.