सहकार्य सेतू -सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संवाद

07 Dec 2024 11:11:29

Cooperative Bridge - Interaction with Cooperative Housing Societies
 
आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी, डोंबिवली नागरी सहकारी बँकेने डोंबिवली मधील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध महत्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी "सहकार्य सेतू " कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला १०६ गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 
सहकार भारतीचे श्री राहुल पाटील, (ऑडिटर्स असोसिएशन अध्यक्ष) आणि श्री गणेश मोरे, (सर्टिफाईड ऑडिटर आणि ट्रेनर) यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. 
 
श्री राहुल पाटील यांनी गृहनिर्माण संस्थांच्या उपविधी संदर्भातील नवीन नियमांबाबत माहिती दिली. "गृहनिर्माण संस्थांचे काम करणे हा थँक लेस जॉब आहे. संस्था चालवताना पदाधिकारी हे सभासदांसाठी मोबदला न घेता बहुमूल्य वेळ देतात. सोसायटीचे व्यवाहर करताना जी काळजी घ्यावी लागते त्यासाठीही त्यांनी सजग राहायला हवे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना उपविधी मध्ये दिलेल्या नियमांबाबत अचूक माहिती व्हावी यासाठी सहकार भारती विशेष प्रयत्न करत असून, ज्या सहकारी संस्थांना याबाबत प्रशिक्षण हवं आहे त्यांनी सहकार भारतीकडे संपर्क केल्यास त्या संस्थांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल, आणि याचा लाभ अधिकाधिक संस्थानी घ्यावा" असे आवाहन करण्यात आले.
 
श्री गणेश मोरे यांनी संस्थेच्या कामकाजबाबत, विविध प्रकारच्या नियमांबाबत, संस्थांना कोणकोणत्या प्रकारचे अहवाल द्यावे लागतात याबाबत थोडक्यात माहिती दिली. संस्थांना उपनिबंधक कार्यालयाच्या मदतीने निवडणुक घेणे आता बंधनकारक असून, त्याबाबत संस्थांनी सजग राहण्याबाबत माहिती दिली. 
 
कर्यक्रमादरम्यान डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या वतीने सोसायटी साठी उपयुक्त QR कोडबाबत तसेच सायबर सुरक्षा, सोसायटी इन्शुरन्सबाबतही थोडक्यात माहिती देण्यात आली.
 
या सर्व सुविधांचा लाभ सर्व संस्थांनी घ्यावा असे आवाहन बँकेच्या क्लस्टर हेड श्रीमती शलाका प्रभू यांनी केले. 
 
कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे अध्यक्ष ऍड. श्री गणेश धारगळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गृहनिर्माण संस्था आणि सहकारी बँक या दोन्ही सहकार तत्वावर काम करत असतात. यात कोणीही स्वावलंबी अथवा परावलंबी नसतो, सर्वजण परस्परावलंबी असतात. सहकार करूनच एकमेकांचा उद्धार होत असतो.
 
डोंबिवली नागरी सहकारी बँक ही सामाजिक भान जपणारी बँक आहे. बँकिंग व्यवसायासोबतच विविध सामाजिक उपक्रम बँक करत असते. येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुक असून, निवडणूकीच्या दिवशी नागरिकांनी आवर्जून मतदान करावे. दुर्जनांच्या दुष्क्रूत्यांपेक्षा, सज्जनांची निष्क्रियताच समाजाचं जास्ती नुकसान करते. येत्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत १००% मतदान करू आणि आपले कर्तव्य बाजावू" असे आवाहन केले. 
 
या निमित्ताने, येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या सोसायटीमध्ये १००% मतदान होईल याबाबत सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन अध्यक्षांनी केले.
 
सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0